Monday, March 2, 2015

भगवान बुध्दांच्या शिकवणीचे लक्षणे – भाग २

भगवान बुध्दांच्या शिकवणीचे लक्षणे – भाग २

अनात्मतता 
भगवान बुद्धांच्या शिकवणीचे दुसरे लक्षण म्हणजे अनात्मता. अनत्तलक्खण सुत्तात भगवान बुध्दांनी अनात्मवादाची लक्षणे सांगितली आहेत. अनात्मततेला पाली भाषेत अनत्त असे म्हणतात.
जगात जर आत्मा असेलच तर तो स्वतंत्र असला पाहिजे. पण तसे आढळत नाही. शरीर म्हणजे रुप हे काही आत्मा असू शकत नाही. जर शरीर हे आत्मा असते तर त्या शरीराला क्लेश झाले नसते. त्यात परिवर्तन झाले नसते. कालमानानूसार बदललेले नसते. पंचस्कंधापैकी इतर चार स्कंध म्हणजे वेदना, विज्ञान, संज्ञा, संस्कार हे सुध्दा आत्मा असू शकत नाही. कारण ते नाक, कान, डोळे, जिव्हा आणि त्वचा या इंन्द्रियावर आणि त्याचे विषयावर म्हणजे गंध, आवाज, दृश्य आकृती किंवा रंग, स्वाद आणि स्पर्श या विषयावर अवलंबून आहे. जसे इंद्रिय, इंद्रियविषय अनित्य आहेत. तसेच वेदनास्कंध, विज्ञानस्कंध, संज्ञास्कंध, संस्कारस्कंध हे सुध्दा अनित्य आहेत म्हणून ह्या परिवर्तनशीलतेमुळे आत्मा आहे असे म्हणता येणार नाही. 
मनुष्याला जेव्हा जाणीव होते की जगातील सर्व गोष्टी म्हणजे 'मी नाही, माझी नाही, माझा आत्मा नाही' तेव्हा त्या गोष्टीबद्दलची त्याची आसक्ती नष्ट होते आणि तो आसक्तीपासून मुक्त होतो. आत्म्यासंबंधीच्या 'मी आहे, माझे आहे, माझा आत्मा आहे' या भ्रामक कल्पनेमुळेच मनुष्य स्वत:च्या हिताकडे जास्त लक्ष देतो. मग दुसर्याीचे नुकसान झाले तरी त्याचे त्याला काही सोयरसूतक नसते. अशा मनुष्याच्या प्रवृतीमुळेच सर्व प्रकारचे दु:ख उत्पन्न होते. दु:ख या रोगावर सर्वात प्रभावी औषध म्हणजे जगात आत्मा नाही याची जाणीव ठेवणे होय.
अनत्त (अनात्मता) या शब्दाचे स्पष्टीकरण तीन प्रकारे केले आहे-
१) असार कत्थेन अनत्ता
माणसाचे शरीरातील प्रत्येक अणु-रेणू बदलत असतात. शरीर, मन बदललेले असते. विचार आणि विचार करणारी यंत्रणा बदललेली असते. पूर्वी लहान होतो. नंतर तरुण, वयस्क व शेवटी म्हातारे झालोत.. जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू असते म्हणून या बदलणार्यात नाम आणि रुपात म्हणजेच शरीर आणि मनात न बदलणारा असा आत्मा वास करु शकत नाही.. 
२) असामी कत्थेन - अनत्ता
नाम आणि रुपात सतत उदय आणि लय किंवा बदल होत असल्यामुळे त्यांचा कोणी स्वामी अथवा मालक असणे शक्य नाही. अनित्यमुळे वस्तुमात्रात उदय आणि लय होणे हा त्याचा मूळ गुणधर्म आहे. हा उदय आणि लय कोणी सांगतो म्हणून किंवा कोणाच्या हुकूमावरुन होत नसून संस्कारीत गोष्टीच्या मूळ गुणधर्माप्रमाणे होतो. म्हणून त्यांना कोणी स्वामी अथवा मालक नाही. ते स्वत:ही त्यांचे मालक नाहीत, म्हणून आत्मा नाही, किंवा अनात्म आहे असे म्हणता येईल. जर पंचस्कंधाचा (रुप, वेदना, विज्ञान, संज्ञा व संस्कार) कोणी स्वामी अथवा मालक असता तर आत्मा म्हणाला असता की माझ्या शरीराला काही क्लेश अथवा दु:ख देऊ नको. पण तसे काही होत नाही. म्हणून आत्मा नाही, किंवा अनात्म आहे असे म्हणता येईल.
३) अवसवत्तनत्थेन - अनत्ता
पंचस्कंधात जे अव्याहतपणे बदल होत असतात तो कोणाच्याही इच्छेने होत नसतो. म्हणून आत्मा नाही, किंवा अनात्म आहे असे म्हणता येईल. 
जर आत्मा असता तर त्याने इच्छा केली असती की माझे रुप असे-असे व्हावे; पण तसे होत नाही. कोणाच्या इच्छेने बदल होत नाही तर ते नैसर्गिकरीत्या अनित्यमुळे घडत असते. नैसर्गिक बदलामुळे म्हातरपण येते, मरण येते. तेथे आत्म्याचे काहीही चालत नाही. म्हणून आत्मा नाही, किंवा अनात्म आहे असे म्हणता येईल. 
जगातील आत्मवादी लोकांचे आत्म्याच्या कल्पनेसंबंधी एकवाक्यता नाही. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मातील शिकवणीप्रमाणे आत्मा आहे. पण मनुष्य प्राण्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा पुन: पुन्हा जन्म घेत नाही. कोणत्याही हिंदुच्या वेदात सुध्दा आत्म्याच्या पुनर्जन्माविषयी एकही वेदमंत्र नाही. जैन धर्मातील आत्मा निरनिराळ्या प्राणीमात्रांच्या शरीराच्या आकारमानाप्रमाणे लहान-मोठा असतो. मुंगीचा आत्मा मुंगीच्या आकाराएवढा तर हत्तीचा आत्मा हत्तीच्या आकाराएवढा, किंवा अष्टकोनी किंवा चेंडूसारखा गोल असून तो पाचशे योजनेच्या व्यासाचा असतो. चार्वाकसारखा विचारवंत म्हणतात की, एकदा जर शरीर भस्मीभूत झाले तर त्याचे पुनरागमन कोठून होणार? असा प्रश्नत उपस्थीत करतात. भगवद्गीातेतील विचारसरणीप्रमाणे आत्मा सूक्ष्म असून आपण जसे जीर्ण वस्त्र बदलवतो तसे तो शरीर बदलवत असतो. काही लोकांच्या विचारसरणीप्रमाणे सर्व प्राण्यांमध्ये एकच आत्मा आहे, तर दुसर्यात काही लोकांच्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक प्राण्यांमध्ये वेगवेगळा आत्मा आहे. 
तसेच आत्मवादी लोकांचे आत्म्याच्या स्वरुपाविषयी सुध्दा एकमत नाही. काही लोक म्हणतात की आत्म्याला रुप आणि आकार आहे, तर काही म्हणतात की आत्मा निराकार आणि अनंत आहे. काही म्हणतात की आत्मा अनुभवशील आहे, तर काही म्हणतात की आत्मा अनुभवशील नाही. आत्म्याविषयीच्या असलेल्या ह्या वेगवेगळ्या कल्पना अशा तर्हेतने केवळ कल्पनेचे खेळ आहेत. त्यात सत्याचा लवमात्र अंश नाही. 
अशा या आत्म्याविषयीच्या अनेक भ्रामक कल्पनांचा मुद्देसूद ऊहापोह दीघनिकायातील ब्रम्हजाल सुत्तात केला आहे. 
काही आत्मवादी म्हणतात की, शरीर बदलत असते पण आत्मा बदलत नाही. या बाबतीत सुध्दा आत्मवादी लोकांमध्ये एकमत नाही. जैन धर्मातील आत्मा शरीराच्या आकारमानाप्रमाणे लहान-मोठा असतो. असे असेल तर जन्माच्या वेळी आत्मा लहान असला पाहिजे. जस-जसा तो मोठा होत जाईल तस-तसा आत्मा पण मोठा होत जात असला पाहिजे. इतर धर्मीय आत्म्याचे निश्चित स्वरुप सांगत नाहीत. जर सर्व प्राणीमात्रात जर एकच आत्मा असेल तर एकाचे डोके दुखले तर दुसर्या चे सुध्दा डोके दुखायला पाहिजे. पण असे अनुभवाला येत नाही. कॊणी म्हणतात की, प्रत्येक प्राण्यामध्ये वेगवेगळा आत्मा असतो. असे जर असेल तर दहा लाख वर्षापूर्वी जी लोकसंख्या होती ती आज कां वाढली? हे वाढलेल्या संखेचे आत्मे आले कोठून? असा प्रश्नं निर्माण होतो. जर प्रत्येक जन्माच्या वेळी नवीन आत्मा निर्माण झाला असेल तर आत्मा न बदलणारा आहे असे कसे म्हणता येईल? म्हणून आत्मा नाही असेच म्हणावे लागेल. 
काही आत्मवादी म्हणतात की, त्यांचा आत्मा जाळल्याने जळत नाही. कापल्याने कापत नाही. उन्हाने वाळत नाही आणि वितळवीण्याने वितळत नाही. असा तो अविनाशी आणि नित्य आहे. शरीरातील आत्म्याच्या अस्तित्वामुळेच प्राणी जीवंत राहतात आणि आत्मा शरीरातून निघून गेल्यावर ते मरतात. 
शरीरात आत्मा आहे म्हणून प्राणी जगतो की त्याचे शरीर ठाक-ठीक आहे म्हणून तो जगतो? याबाबत ते आत्मवादी काहीच ठामपणे सांगु शकत नाहीत. मनुष्य जर ८० किवा ९० टक्के भाजला तर तो जगू शकत नाही. जळाल्यामुळे तो मरतो. जर शरीरातील आत्मा जाळल्याने मरत नाही तर शरीरात आत्मा असून सुध्दा जळालेला मनुष्य कसा मरतो? कापल्याने आत्मा मरत नाही तर एखाद्याला भोसकले तर तो मनुष्य शरीरात आत्मा असून सुध्दा कसा मरतो? उन्हाने वाळत नाही आणि वितळवीण्याने वितळत नाही. तर एखाद्याला उष्माघात झाला तर तो मनुष्य शरीरात आत्मा असून सुध्दा कसा मरतो? याचा अर्थ शरीरात आत्मा असल्यामुळे तो जीवंत राहतो, हे शरीरशास्त्रदृष्ट्या खरे नाही. शरीरात आत्मा आहे म्हणून तो जीवंत राहत नसून, त्याच्या शरीराची यंत्रणा सुरळीतपणे काम करते म्हणून मनुष्य जीवंत राहतो, हे खरे असते.
भगवद्गीातेतील विचारसरणीप्रमाणे आत्मा जीर्ण वस्त्र बदलवतो तसे तो शरीर बदलवत असतो. असे जर असते तर जन्म न घेतलेल्या किंवा जन्माला आलेल्या मुलींना मारले जातात तेव्हा त्यांच्यातील आत्म्यांना अजून ते शरीर जुने झाले नसतांना सुध्दा त्यांचे शरीर कसे जिर्ण होते? जर आत्मा जुने शरीर टाकून नविन शरीर धारण करतो, तर दरवर्षी वाढणार्याज लोकसंख्येत हे नविन आत्मे येतात कोठून? कोणी आत्मवादी माणसाच्या मनाला आत्मा म्हणतात. माणसाचे मन तर सतत बदलत असते. ते अत्यंत चंचल व अस्थिर असते. म्हणून मन हे न बदलणारा आत्मा असू शकत नाही. 
यावरुन असे दिसून येईल की, आत्मवाद्यांचे एकही म्हणणे कसोटीला उतरत नाही. म्हणून बौध्द विचारप्रणाली आत्म्याच्या अस्तित्वाला मानत नाही. बौध्द अनात्मवादी आहेत. बौध्द मताप्रमाणे ज्याला आपण सजीव प्राणी असे म्हणतो, तो खरोखरच चेतनामय शक्ती आणि शारीरीक अविष्कार असतो. त्या शक्ती म्हणजे पंचस्कंध होय. हे पंचस्कंध म्हणजे रुपस्कंध, वेदनास्कंध, विज्ञानस्कंध, संज्ञास्कंध व संस्कारस्कंध होय.
मनुष्यप्राण्याचे सर्व घटक म्हणजे नामरुप, विज्ञान, संज्ञा, वेदना, व संस्कार तसेच पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू हे पंचस्कंधात सामावलेले आहेत. पंचस्कंधाशिवाय मनुष्यप्राण्यात दुसरा कोणताच घटक अस्तित्वात नाही. असा कोणताच घटक नाही की जो पंचस्कंधात सामावलेला नाही. सर्व पंचस्कंध सतत बदलणारे आहेत. परिवर्तनशील आहेत.
तसेच रुप (शरीर) हे १) पृथ्वी, २) पाणी, ३) अग्नी आणि ४) वायू या चार घटकांचे बनलेले आहेत तसेच प्रत्येक वस्तू हे चार घटकांचे बनलेले असते. हे चार घटक सृष्टीमध्ये निसर्गत:च विद्यमान असतात. 
चेतनामय शक्ती ही वेदना, संज्ञा, संस्कार, व विज्ञान, यांची मिळून बनलेली असते. 
एखाद्या बाह्यस्थितीचा आपल्या ज्ञानेंद्रियाला स्पर्श होताच जे तरंग शरीरात निर्माण होतात ते म्हणजेच वेदना. वेदना कशी निर्माण होते, ते मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे.
आपल्या सर्व प्रकारच्या संवेदना वेदनास्कंधात मोडतात. वेदना म्हणजे इंद्रियांचा इंद्रिय विषयांशी संपर्क झाला असतांना जाणवणारी अनुभूती होय. ह्या अनुभूती तीन प्रकारच्या असतात-
१) सुखमय अनुभूती
२) दु:खमय अनुभूती 
३) अदु:खमय व असुखमय अनुभूती 
वेदनास्कंध 
एखादे रुप पाहिल्याने, आवाज ऎकल्याने, वास घेतल्याने, चव घेतल्याने, स्पर्श केल्याने व मनांत कल्पना किंवा विचार आल्याने संवेदना निर्माण होत असतात. त्या सहा प्रकारच्या संवेदना डोळा, कान, नाक, जिभ, त्वचा आणि मन अनुभवत असतो. जेव्हा ज्ञानेंद्रिय, ज्ञानेंद्रिय विषय आणि ज्ञानेंद्रिय विज्ञान यांचा समन्वय झाल्याने स्पर्श होतो, तेव्हाच संवेदना निर्माण होत असतात. म्हणून स्पर्शामुळे वेदना निर्माण होत असतात. जसे एखादे सुंदर फुल, पाहणार्यांतचा डोळा आणि त्याचे विज्ञान यांचा समन्वय झाला म्हणजे सुखमय अनुभूती होते 
संज्ञास्कंध
संज्ञास्कंधाचे कार्य म्हणजे इंद्रियविषयांना ओळखणे, त्याची जाण करणे होय. संवेदना प्रमाणे संज्ञा सहा प्रकारच्या आहेत. जसे रुपाला ओळखणे, आवाजाला ओळखणे, वासाला ओळखणे, चवीला ओळखणे, स्पर्श केल्याने व मनांत कल्पना किंवा विचार आल्याचे ओळखणे असे ते सहा प्रकारच्या संज्ञा आहेत. 
विज्ञान आणि संज्ञा यांच्यात एक प्रकारचे सारखेपणा आहे. पण विज्ञानामुळे इंद्रियविषयांच्या अस्तित्वाची जाण होते, तर संज्ञा त्याच्या विशिष्ट खुणांमुळे त्या वस्तुला इतर वस्तुतून ओळखते. संज्ञा मुळे वस्तुचे स्मरण होते.
संस्कारस्कंध
संस्कारस्कंधात संवेदना आणि जाणण्याची किंवा ओळखण्याची क्षमता सोडून मनाच्या इतर सर्व भागांचा समावेश होतो. म्हणून याला संस्कार चेतना असे सुध्दा म्हणतात. मनाच्या व्यवहारात चेतना किंवा ईच्छा फार महत्वाचे कार्य करते. कार्य करण्याच्या ईच्छेने एखादे कार्य केले तरच बुध्दधम्माप्रमाणे ते 'कर्म' होते. ईच्छा नसतांना जर एखादे कार्य केले तर ते 'कर्म' होऊ शकत नाही. 
संवेदना आणि संज्ञा याच्याप्रमाणे चेतना सुध्दा सहा प्रकारच्या आहेत. जसे रुपाचे कार्य, आवाजाचे कार्य, वासाचे कार्य, चवीचे कार्य, स्पर्शाचे कार्य, स्पर्श केल्याने व मनांत कल्पना किंवा विचार आल्याने होणारे कार्य, असे ते सहा प्रकारच्या संस्कार आहेत. 
विज्ञानस्कंध
सर्व स्कंधात विज्ञानस्कंध अत्यंत महत्वाचे आहे. विज्ञानाने जाणण्याची व निरनिराळ्या प्रकारे अनुभूती घेण्याची क्रिया करता येते. आपण आपल्या पांच ईंद्रियाद्वारे आणि मनाद्वारे निरनिराळ्या प्रकारची अनुभूती घेत असतो. जसे आपण आपल्या डोळ्याद्वारे बाह्य वस्तूमात्र जाणत असतो. कानाद्वारे आवाज जाणत असतो. नाकाद्वारे वास जाणत असतो. जिभेद्वारे चव जाणत असतो. त्वचेद्वारे स्पर्श जाणत असतो. आणि मनाद्वारे कल्पना आणि विचार जाणत असतो. अशा तर्हेदने विज्ञान सहा प्रकारचे आहेत. चक्षू विज्ञान, कर्ण विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, स्पर्श विज्ञान आणि मनो विज्ञान. दृश्य आकृती आणि रंग, आवाज, वास, चव, स्पर्श, कल्पना आणि विचार हे इंद्रिय विषय असले आणि त्याचा संबंध अनुक्रमे डोळे, कान, नाक, जिभ, त्वचा व मन या इंद्रियांशी आला तरच विज्ञान जागृत होते, इतर वेळी नाही. अशा वेळेस सुख-दु:खाच्या भावना निर्माण होतात. 
त्याचप्रमाने कल्पना आणि विचार हे इंद्रिय विषय मनात आले तरच मनिंद्रिय विज्ञान जागृत होते आणि सुख-दु:खाच्या भावना निर्माण होतात. ह्यावरुन असे स्पष्ट होते की इंद्रिय आणि विषयाचा एकमेकांशी संबंध आलाच तर विज्ञान जागृत होते. कारण त्यावेळी आपले चक्षुंद्रियविषय विज्ञान जागृत नसते. म्हणून इंद्रिय आणि त्या त्या इंद्रियाच्या विषयाचा एकमेकांशी संबंध असतो. ते एकमेकावर अवलंबून असतात. म्हणूनच विज्ञान सुध्दा शाश्वत नाही तर ते क्षणाक्षणाला बदलत असतात. 
अशा तर्हेेने जिवंत प्राण्याच्या जिवंतपणाचे सर्व व्यवहार चेतनामय शक्ती आणि शारीरिक शक्ती रुप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान या पंचस्कंधामुळे होत असतो.
म्हणजेच सक्षम इंद्रिय, इंद्रिय विषय आणि इंद्रिय विज्ञान यांचा समन्वय झाला की स्पर्श निर्माण होते. स्पर्श निर्माण झाला की सुखमय, दु:खमय, व अदु:खमय व असुखमय वेदना उत्पन्न होतात. अशा तर्हे्ने सुख-दु:ख निर्माण होते व त्याची अनुभूती जाणवते, त्यामुळे सुख-दु:ख भोगणारा कोण? हा प्रश्नस निर्माण होत नाही. कारण सुख-दु:ख भोगणारा कोणी आत्मा नावाचा पदार्थ शरीरात किंवा शरीराबाहेर राहत नाही. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'बुध्द आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात म्हणतात की, 'भगवान बुध्दांनी आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ईश्वराच्या अस्तित्वाच्या चर्चेइतकीच निरुपयोगी मानलेली आहे. ईश्वराच्या अस्तित्वाइतकाच आत्म्याच्या अस्तित्वासंबंधीचा विश्वास सम्मादिट्ठीला (सम्यक दृष्टी) घातक आहे. भगवान बुध्दांनी सांगितले आहे की, ईश्वरावरील विश्वास हा ज्या प्रकारे भ्रामक समजुती निर्माण करतो, त्याच प्रकारे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना कारणीभूत होतो. त्यांच्या मते आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षाही भयंकर आहे. कारण त्यामुळे पुरोहित वर्ग निर्माण होतो, भ्रामक समजुतीचा मार्ग मोकळा होतो, एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्ता गाजविण्याचा अधिकारही बहाल करतो. भगवान बुध्दांनी महालीला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, आत्मा नावाची काही वस्तू नाही. म्हणूनच त्यांच्या सिध्दांताला अनात्मवाद असे म्हणतात.' 
भगवान बुध्द म्हणतात की, आत्म्याचे अस्तित्वावर विश्वास ठेवणे हे अज्ञान असून हे अज्ञान माणसाच्या सर्व दु:खाचे, समस्येचे मुळ कारण आहे. अशा अज्ञानामुळेच त्यांच्यात 'मी' 'माझे' अशी भावना निर्माण होते. त्यामुळेच त्यांच्यात लोभ, द्वेष व तृष्णा निर्माण होते. परिणामत: तो पापकर्म, अकुशल कर्म करु लागतो व ते दु:खाच्या उत्पत्तीचे कारण बनते. भगवान बुध्दांची शिकवण माणसाचे अज्ञान दूर करुन त्याला प्रज्ञावंत बणविण्यासाठी आहे. त्याची प्रज्ञा विकसित झाली की जग जसे आहे तसे तो पाहतो. त्यामुळे कोणत्याही उत्पतीच्या मागे कारण असते हे त्याला कळते. त्यामुळे जग अनित्य आहे, जे अनित्य आहे ते दु;ख आहे. जे दु:ख आहे ते 'मी नाही, माझे नाही, माझा आत्मा नाही' असे त्याला दिसते. हा माझा आत्मा नाही.' असे यथार्थत: प्रज्ञापुर्वक पाहिले की चित्ताची आसक्ती निर्माण होणार नाही. त्यामुळे 'मी, माझ्या' या भावनेला तो कवटाळून न धरल्यामुळे 'अहंभाव, मीपणा' निर्माण होणार नाही. तो दु:ख आर्यसत्यांना यथार्थपणे जाणेल. तो सुख-दु;खांना तटस्थेच्या भावनेने पाहू लागेल. त्यामुळे त्याच्यात तृष्णा निर्माण होणार नाही. त्याच्यातील लोभ, द्वेश, मोह नष्ट होऊन त्याऎवजी मैत्री आणि करुणा यांचा विकास होईल. म्हणजेच त्याला दु:ख होणार नाही. तो कुशल कर्म करु लागेल व अशा तर्हेयने तो निर्वाणाकडे वाटचाल करेल. अशा प्रकारे दु:खापासून दूर राहून निर्वाणाकडे वाटचाल करता येते, अशी भगवान बुध्दाने आपल्या शिकवणीत मांडणी केली आहे.
आर.के.जुमळे, अकोला


No comments:

Post a Comment